Language: English Hindi Marathi

प्रशिक्षकांच्या मोफत प्रशिक्षण (टिओटी) उपक्रमात १९ ऑगस्टपासून क्वालिटी इन्स्पेक्टरसाठी प्रशिक्षण

माहिती देण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे चिंचवड येथे कार्यशाळा
पिंपरी, पुणे, (दि. ६ ऑगस्ट २०२२ ) : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालया तर्फे इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे चिंचवड येथे सध्या सीएनसी ऑपरेटींग व प्रोग्रामिंग आणि वेल्डिंग टेक्नॉलॉजी या विषयांचा      ड्युएल वेट जर्मन मॉडेलवर आधारित
प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (टीओटी) सुरू असून, हे प्रशिक्षण मोफत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १९ ऑगस्टपासून क्वालिटी इन्स्पेक्टर या विषयांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी मंगळवारी (दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी) दुपारी ३ ते ५ या वेळेत इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे, चिंचवड येथे नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारी, खासगी आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालये, खासगी संस्था यामध्ये काम करीत असलेले प्रशिक्षक यांना त्यांचे प्रशिक्षण तंत्र उच्चतम करण्यासाठी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कुशल तंत्रज्ञ, औद्योगिक आस्थापनामधून सेवानिवृत्त झालेले व त्यांच्या कडील ज्ञान व अनुभवाद्वारे नवीन प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करू इच्छिणारे तंत्रज्ञ, तांत्रिक सल्लागार यांना या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेऊन जागतिक दर्जाचे प्रशिक्षक होण्याची संधी प्राप्त होणार आहे, अशी माहिती इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे यांनी गुरुवारी दिली.
हा उपक्रम राबविण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल कौन्सिलची (ASDC) यांची नेमणूक केली आहे. जेसेलशाफ्ट फॉर इंटरनॅशनल झुसंमेनार्बेटच्या (जीआयझेड) च्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या “संकल्प” योजनेअंतर्गत इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे चिंचवड येथे ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल कौन्सिल (ASDC) यांच्या सहकार्याने “ट्रेन द ट्रेनर्स कार्यक्रम” २४ जूनपासून सुरू झाला असून यामध्ये सरकारी, खासगी आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालये, खासगी संस्था, उद्योगामध्ये काम करणारे कर्मचारी सहभागी झाले आहेत.
वरील ट्रेड मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आपल्या देशात तसेच परदेशात देखील मोठी मागणी आहे .सदर कुशल मनुष्यबळ उद्योगांच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी उत्तम प्रशिक्षकांची गरज लक्षात घेता या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम हा उद्योजकांच्या सल्ल्याने व सहभागातून तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रामधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून प्रत्यक्ष उद्योगांमध्ये कसे काम चालते याचे उत्तम आकलन व्हावे म्हणून ४ आठवड्यांचा ऑन जॉब ट्रेनिंगचा (OJT ) अंतर्भाव या प्रशिक्षणामध्ये आहे. ड्युएल वेट जर्मन मॉडेल वर आधारित या कार्यक्रमामध्ये जर्मन मास्टर ट्रेनरचे देखील मार्गदर्शन सात दिवस लाभणार आहे. सदर कार्यक्रम पुर्णतः निशुल्क असून प्रशिक्षणार्थींना १०,००० रुपये शिष्यवृत्ती  देण्यात येत आहे. तसेच, पुण्याबाहेरील प्रशिक्षणार्थींची मोफत निवास व्यवस्था करण्यात येते. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना ऑटोमोटिव्ह सेक्टर  स्किल  कौन्सिल आणि इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स अशी  दोन प्रमाणपत्र दिली जातात. प्रशिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती किंवा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही नक्कीच सुवर्णसंधी असून याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे, चिंचवड तर्फे करण्यात येत आहे.
सदर क्वालिटी इन्स्पेक्टर प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती मिळावी, या उद्देशाने  मंगळवारी (दि. ९ ऑगस्ट ) दुपारी ३ ते ५ या वेळेत इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे, चिंचवड येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मोफत राहील. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पुढील लिंक वर नाव नोंदणी करण्यात यावी:
 https://forms.gle/6fFw7aqveb9VJqNbA   इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ९५९५७१५७०२ / ९६०७६७७३३४ क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.