उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या जीवितहानीबाबत खरगे व राहुल गांधींचा शोक व्यक्त

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या जीवित व मालमत्तेच्या नुकसानीवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सरकारला राहत व बचावकार्य वेगाने राबवण्याचे आवाहन केले आहे.उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे मंगळवारी ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला अचानक पूर आला आणि त्यात चार जणांचा मृत्यू झाला. याशिवाय अनेक घरं व हॉटेल्स पाण्यात वाहून गेली, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी एका निवेदनात म्हटले,उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या दुर्दैवी घटनेने आम्ही व्यथित आहोत. या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर मदत मिळावी आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे.”राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना म्हटले की,”उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीने मन सुन्न झालं आहे. सरकारने बचावकार्याला अधिक वेग द्यावा आणि गरजू नागरिकांना तातडीने मदत पोहोचवावी.”राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू असून, NDRF आणि SDRF पथकांना तैनात करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.या नैसर्गिक संकटामुळे संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण असून, केंद्र व राज्य सरकारकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish