मुंबईवरील पाणीबाणीवर आज तोडगा निघणार, महापालिकेचे आदेश काय?

मुंबई शहर सध्या गंभीर पाणीटंचाईला सामोरे जात आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या (CGWA) नव्या नियमावलीविरोधात पुकारलेला संप. हा संप मागील चार दिवसांपासून सुरू असून, त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याचा पुरवठा कोलमडला आहे.

CGWA च्या नव्या नियमानुसार विहिरी व कूपनलिकांमधून पाणी उपसण्यासाठी नवीन परवानग्या आवश्यक झाल्या आहेत. यामुळे अनेक टँकर चालकांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांनी 10 एप्रिलपासून संप पुकारत निषेध नोंदवला आहे.

या पृष्ठभूमीवर मुंबई महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू करत, शहरातील विहिरी, कूपनलिका आणि खासगी टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उद्देश म्हणजे नागरिकांना पाणी पुरवण्यात अडथळा येऊ नये. महापालिकेच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात टँकरसेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज (14 एप्रिल) दुपारी 12.30 वाजता मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे प्रतिनिधी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत. ही बैठक त्यांच्या शासकीय निवासस्थानी होणार असून, यात टँकर असोसिएशन आपल्या समस्या, मागण्या आणि अडचणी मांडणार आहे. विशेषतः मुंबईसाठी नियमांमध्ये काही शिथिलता आणण्याची मागणी ते करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घातले होते. त्यानंतर विहिरी व कूपनलिकांवरील काही नोटिशींना तात्पुरती स्थगिती देण्यात आली. तरीही टँकर चालकांनी संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलत पाणीपुरवठा थांबू नये यासाठी टँकर सेवा ताब्यात घेतली आहे.

शहरातील रुग्णालये, शाळा, आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत असून, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे आज होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. टँकर असोसिएशन आणि प्रशासन यांच्यात तोडगा निघाल्यास, मुंबईकरांना पुन्हा एकदा नियमित पाण्याचा पुरवठा मिळू शकतो.

संपूर्ण शहराचे लक्ष आजच्या बैठकीकडे लागले असून, लवकरच या पाणीबाणीवर समाधानकारक तोडगा निघेल अशी आशा सर्वत्र व्यक्त होत आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi