डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे यांचं मनोगत

मुंबईच्या शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्याला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पूर्वनियोजित भाषण होऊ शकलं नाही. याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी यावर स्पष्टपणे आणि अत्यंत भावनिक शब्दांत उत्तर दिलं.

“बाबासाहेब हा आपला श्वास आहे. तो आपला दीपस्तंभ आहे. त्यांचं दर्शन घेणं, त्यांच्या स्मरणस्थळी उपस्थित राहणं हेच माझ्यासाठी सर्वात मोठं आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “भाषण झालं नाही म्हणून मी नाराज नाही. उलट, बाबासाहेबांच दर्शन हेच माझ्यासाठी मोठं भाषण आहे. प्रत्येकाने बाबासाहेबांचा एक तरी गुण आत्मसात केला पाहिजे. जर तुमच्यात बाबासाहेबांचा एक अंश जरी उतरला, तरी तुमचं जीवन सफल होईल,” असंही ते म्हणाले.

बोलताना त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर भर दिला. “बाबासाहेबांनी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतासाठी सर्वोत्तम घटना तयार केली. समता, बंधुता आणि न्यायाचे मूल्य त्यांनी दिले. त्यामुळेच आज एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो, एक सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि एक आदिवासी भगिनी देशाची राष्ट्रपती होऊ शकते. ही सगळी बाबासाहेबांच्या संविधानाची जादू आहे,” असा गौरव त्यांनी व्यक्त केला.

“भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता… मर गए होते युंही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता,” या ओळींच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचं भावनिक आणि प्रेरणादायी स्मरण केलं.

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक मुंबईत उभारलं जात आहे. हे स्मारक असं असेल की संपूर्ण जगाला त्याचा अभिमान वाटेल. आजचा दिवस केवळ त्यांच्या जयंतीचा नाही, तर त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा देण्याचा आहे,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

शेवटी त्यांनी स्पष्ट केलं की, “आमचं सरकार बाबासाहेबांच्या विचारांवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणारं आहे. आम्ही सर्वसामान्य माणसांसाठी, त्यांच्या न्यायासाठी काम करत राहू. हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल.”

या संपूर्ण घटनाक्रमातून स्पष्ट होतं की, भाषण होणं-न होणं यापेक्षा बाबासाहेबांच्या स्मरणस्थळी प्रत्यक्ष जाऊन त्यांना अभिवादन करणं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi