ऑस्कर विजेता संगीतकार जॉन बॅटिस्टेची भारतात पहिली सफर – दिल्ली व मुंबईत होणार सादरीकरण

नवी दिल्ली, २ सप्टेंबर:ऑस्कर विजेते आणि प्रसिद्ध अमेरिकन संगीतकार जॉन बॅटिस्टे लवकरच भारतात आपले पहिले सादरीकरण करणार असून, ते दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांमध्ये आपल्या संगीताची जादू उधळणार आहेत.

३८ वर्षीय बॅटिस्टे यांचा पहिला कार्यक्रम २४ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरच्या प्लेनरी हॉलमध्ये होणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत दुसरा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

भारतातील संगीत परंपरेविषयी आपले प्रेम व्यक्त करताना बॅटिस्टे म्हणाले, “भारताचा संगीत आत्मा नेहमीच मला प्रेरणा देत आला आहे. या देशाची सांगीतिक विविधता आणि सांस्कृतिक समृद्धी मला नेहमी आकर्षित करत आली आहे. भारतात प्रत्यक्ष संगीत सादर करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.”

जॉन बॅटिस्टे हे सोल (Soul) या अॅनिमेटेड चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. त्यांचा संगीतशैलीत जैझ, ब्लूज, आरअ‍ॅण्डबी आणि गॉस्पेल यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

भारतामध्ये त्यांचे हे सादरीकरण केवळ संगीत मैफिल न राहता, दोन संस्कृतींचा सुंदर मिलाफ ठरेल, असा विश्वास त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.

संगीतप्रेमींसाठी ही एक खास पर्वणी ठरणार असून, देशभरातून श्रोते या कार्यक्रमांसाठी दिल्ली आणि मुंबईकडे येण्याची शक्यता आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi