पुणे : कोथरूड पोलीस ठाण्यात तरुणींवरील छळप्रकरण — गंभीर लैंगिक आणि जातीय शोषणाचे आरोप

पुणे (4 ऑगस्ट): पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींवर झालेल्या कथित मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळाच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून आलेल्या एका प्रकरणाच्या चौकशीसाठी या मुलींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र, चौकशीच्या नावाखाली तब्बल पाच तास त्यांच्यावर अमानवी वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तरुणीच्या तक्रारीतील धक्कादायक खुलासे:

  • जातीय अपमान: “तुझं आडनाव काय? तू अशीच वागणार!” असे जातीय अपमान करणारे प्रश्न विचारले गेले. एका पोलीस अधिकाऱ्याने तर, “तुझा खून होईल, तु अशी जगूच शकत नाहीस,” अशी थेट धमकी दिल्याचा आरोप आहे.

  • लैंगिक शेरेबाजी व अपमान: “किती पोरांसोबत झोपतेस?”, “तुझ्या रूमवर पोरं येतात का?”, “तू आणि तुझ्या मैत्रिणीचं नातं लेसबियन वाटतंय,” अशा वाक्यांचा उल्लेख करत तरुणीने लैंगिक अपमानाची तक्रार दिली आहे. “तुला बाप नाही, आईने पण तुला वाऱ्यावर सोडलंय,” असं म्हणत वैयक्तिक अपमानही करण्यात आला.

  • शारीरिक छळ आणि अनुचित स्पर्श: एका पुरुष पोलीस अधिकाऱ्याने चौकशीच्या नावाखाली अंगावर येऊन खांद्यावर, हनुवटीवर विकृतपणे स्पर्श केल्याचं आणि पाठीवर चापट्या, पायावर लाथा मारल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

  • मानसिक छळ: महिलांना सहा तास रिमांड रूममध्ये बंद करून ठेवण्यात आले आणि त्यादरम्यान त्यांच्यावर अवमानकारक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

संभाजीनगरमधील 23 वर्षीय विवाहित महिला कौटुंबिक हिंसाचारामुळे पुण्यात आली होती. तिला मदत करणाऱ्या तीन दलित तरुणींना कोणतीही नोटीस न देता पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आणि तिथे त्यांच्यावर कथितपणे जातीय, लैंगिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, पो.नि. अमोल कामटे आणि कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट गंभीर आरोप करण्यात आले आहेत.


सध्या काय परिस्थिती?

या तक्रारीनंतर सामाजिक कार्यकर्ते, महिला आयोग आणि दलित संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. मानवाधिकार आणि महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi