राज्यात उष्णतेचा चटका कायम; मुंबईसह अनेक भागांत पावसाचा इशारा; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण, IMDचा अंदाज काय?

मुंबई : राज्यभर सध्या उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवतोय. मार्चच्या अखेरपासून सुरू झालेला उष्णतेचा लाटा अजूनही कायम आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसेंदिवस तापमानाचे स्तर वाढत चालले आहेत. अकोल्यात तब्बल ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या विक्रमी उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत.

तापमानाचा तडाखा इतका प्रचंड आहे की, अकोल्यातील राम मंदिरात गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कुलर लावण्यात आला आहे. ही परिस्थिती पाहता उष्णतेपासून मिळणारा कोणताही दिलासा लोकांना सुखद वाटतोय.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकणात पुढील दोन दिवसांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर पावसाच्या सरींसाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण असून दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वारे आणि गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या येवला तालुक्यात काल दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. राजापूर आणि पन्हाळसाठे परिसरात गारांचा पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कांदा साठवून ठेवलेला असल्याने पावसामुळे त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतकरी वर्गासाठी हे हवामान अधिकच अडचणीचे ठरत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकरी अशोक ढास यांनी दीड लाख खर्च करून टोमॅटोचे पीक घेतले. मात्र सध्या बाजारात टोमॅटोला केवळ ५ ते १० रुपये किलो दर मिळत आहे. त्यामुळे एवढ्या खर्चानंतर देखील उत्पादन विक्रीतून काहीच नफा मिळत नाहीये. अशा परिस्थितीत त्यांनी पीक बाजारात नेण्याऐवजी शेतातच सडू दिलं आहे.

राज्यभरातील बदलत्या वातावरणामुळे सामान्य नागरिकांबरोबरच शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी सुद्धा हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्रतेत पावसाची चाहूल दिलासा देणारी असली तरीही त्यातून निर्माण होणाऱ्या संकटांवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. हवामान खात्याचे अंदाज खरे ठरले, तर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचबरोबर पावसामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठीही प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi