महाराष्ट्रात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – काँग्रेसची मागणी

मुंबई, २३ सप्टेंबर – मागील काही दिवसांपासून मराठवाडा विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे.

सपकाळ यांनी सरकारकडे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला “ओला दुष्काळ” जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५०,००० रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशीही ठाम मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले, “राज्य सरकार वेळ वाया घालवत केवळ पाहणी व सर्वेक्षण करत बसले आहे. पण परिस्थिती इतकी गंभीर आहे की तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, अनेकांचे घरे कोसळली आहेत आणि आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहता, मदतीसाठी कुठलाही विलंब न करता त्वरित आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य पुरवले पाहिजे.”

गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक गावांमध्ये पिके अजूनही पाण्याखाली आहेत. शेकडो घरे पडली असून जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत.

काँग्रेसने सरकारला उद्देशून म्हटले की, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, तर त्यांचे दुःख समजून त्यांना तत्काळ मदत द्यावी. या संकटाच्या काळात राजकारण न करता सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असेही सपकाळ यांनी सांगितले.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi