Language: English Hindi Marathi

शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले की, भाजपाकडे कोणीही सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही.

त्यांनी सांगितले की, भाजपाच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेते.

शिवसेनेच्या दोनतृतियांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे, त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच ते शरद पवार यांनाही आहे. त्यानुसार ते मत व्यक्त करत असतात.

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही. तथापि, अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, असे आपण यापूर्वी सातत्याने म्हणत होतो, याची त्यांनी पत्रकारांना आठवण करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.